यशाची व्याख्या की अपेक्षांचे ओझे….(भाग एक)

Share

बारावी आणि दहावीचा निकाल म्हणजे पालक, शिक्षक आणि मुलांसाठी जणू कित्येक वर्ष अग्नीपरिक्षा ठरत आली आहे.
अश्यावेळी संभ्रम, अविश्वास, भीती, तसेच स्वप्ने, आत्मविश्वास अशा मिश्र भावनांचा कल्लोळ सुरू होतो.

गेल्या काही वर्षात जागृत झालेले पालक म्हणताना नक्की म्हणू लागलेत,
“कितीही टक्के मिळाले तरी चालतील, फक्त पास हो”,
“निकाल काहीही लागला तरी आम्ही सोबत आहोत.”
पण असे बोलणारे 90 टक्के पालक (आलेच पुन्हा टक्के!) निकालाच्या दिवशी मात्र गडबडतात.
मित्रांच्या मुलाचे, नातेवाईकांच्या मुलांचे टक्के पाहून अस्वस्थ होतात, तुलना करतात, प्रश्न विचारतात – “आपण मागे पडलो का?”

कर्नाटकात एका कुटुंबाने आपला पाल्य नापास झाला म्हणून सेलिब्रेशन केले.
का? कारण त्या मुलाने प्रामाणिक प्रयत्न केला, स्वतःवर आणि भविष्यातील संधींवर विश्वास ठेवला.
दुसरीकडे, काही ठिकाणी 75 टक्के मिळवलेली मुलंही स्वतःला कमी लेखत आहेत.

याचा अर्थ, अजूनही आपण मार्क आणि टक्केवारीच्या समजुतींमधून सुटलेलो नाही.
माझं वैयक्तिक मत आहे की आपण सुटू शकत नाही, कारण यामागे एक खूप मोठं षडयंत्र आहे –

एक शैक्षणिक, सामाजिक, आणि आर्थिक षडयंत्र.

टक्केवारी ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, ती मानांकनाची, स्पर्धेची आणि बाजाराच्या गरजांची गोष्ट आहे.
कंपन्यांना टॉपर्स हवेत, कॉलेजेसना गुणांचे आकर्षण हवे, आणि पालकांना समाजात मान मिळवण्यासाठी ‘हुनरवंत’ मूल हवे.
हे सगळं जुळवताना ‘माणूस’ हरवतो.
स्वतःचे स्वप्न, आपली खासियत, आणि त्यातली मजा हरवते.

यश म्हणजे नेमकं काय?
मुलं जर आपल्या क्षेत्रात आनंदाने, नितांत सचोटीने आणि प्रामाणिकतेने काम करत असतील,
तर मग टक्के किती आले याला अर्थ काय?
कधी तरी आपल्याला समजून घ्यावं लागेल की, यशाची व्याख्या ही मार्कशीटवर ठरत नसते, ती ठरते आयुष्य जगण्याच्या दृष्टिकोनावर.

म्हणूनच आज पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने नव्याने विचार करण्याची गरज आहे.
अपेक्षा असाव्यात, पण त्या समजूतदार असाव्यात.
मार्गदर्शन असावं, पण नियंत्रण नाही.
प्रोत्साहन असावं, पण तुलना नाही.

कारण निकाल हा अंत नव्हे – ती सुरुवात असते.


आपल्या मुलांचं भविष्य ‘मूल्यांवर’ घडवा, ‘मार्कांवर’ नव्हे.
यशाच्या खऱ्या अर्थासाठी – विचार बदला, व्यवस्था बदला!

– डॉ. अजय दरेकर,
Youth Empowerment Expert

आपण अशा विचारांनी एकत्र यायला हवं.
युवकांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी
‘Youth Empowerment Program’ (YEP) च्या प्रवासात सामील व्हा.
अधिक माहितीसाठी आणि असेच विचारप्रधान लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.drajaydarekar.com


Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top