“वेळेवर करेल कृती, त्याच्याच आयुष्याला गती…!”
ह्या पुस्तकाचा पाया “कृती” हा आहे. कारण विद्यार्थी असो किंवा शिक्षक, व्यवसायिक असो अथवा गृहिणी, समाजसेवक असो अथवा राजकारणी; आतापर्यंत इतिहासात हे सिद्ध झाले आहे की, ज्यांनी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर कृती केली तीच व्यक्ती सामन्यांतून असामान्य झाली आहे.
हे पुस्तक तूम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. त्यामूळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळविण्याचा निर्धार करा. आणि मिळालेल्या उत्तरांवर त्वरित कृती करा.
तर मित्रांनो कृती करायला तयार आहात ना ??
*”सुरुवात लहान करा, पण ध्येय मोठे ठेवा.”*
*- स्टीव्ह जॉब्ज.*
मी स्वतः मध्ये परिवर्तन घडवू शकतो हा आत्मविश्वास मिळवणे हिच आपल्या प्रवासाची पहिली पायरी आहे.
मग आत्मविश्वास आपल्याला कुठून मिळतो ?
1. आपण ठरवलेली गोष्ट पुर्ण करुन दाखवल्यावर !
2. आपल्यासमोर आलेले आवाहन पूर्ण केल्यावर !
3. स्वतः मध्ये किंवा इतरांमध्ये एखादा सकारात्मक बदल घडवल्यावर !
4. बरेच दिवस रखडूण राहिलेल्या गोष्टींवर कृती केल्यावर !
5. आपल्याला आवडत नसणारी गोष्ट कौशल्याने हाताळल्यावर !
आणि एखादी गोष्ट कौशल्याने हाताळण्यासाठी पहिलं पाऊल उचलून कृती केल्यावर आपला आत्मविश्वास वाढत असतो. तसेच या गोष्टी करत असताना जर आपल्या जवळच्या व्यक्तींनी आपल्याला शाबासकी दिली तर आपला आत्मविश्वास द्विगुणीत होतो.
मग मित्रांनो आताच लिहुन काढा ह्या अशा लहान सहान गोष्टी ज्यावर कृती करणे तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. ह्यात तूम्ही तुमच्या पालकांच्या शिक्षकांच्या किंवा मग मित्र परिवाराच्या छोट्या छोट्या अपेक्षा लिहू शकता फक्त इतके लक्षात ठेवा की या कृती तुमच्यासाठी व समाजासाठी सकारात्मक असाव्यात.
मग आताच यादी तयार करुया…!!
१.
२.
३.
.
.
.
१०.
काही सुचलं का ? ज्यांना सुचले त्यांचे अभिनंदन कारण तुमच्या कृत्या ठरल्या आणि ज्यांना सुचले नाही त्यांचे ही अभिनंदन कारण तूम्ही निदान ह्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केलीत. अल्बर्ट आइनस्टाईन म्हणाले होते की माणूस आयुष्यभर सर्व शिकतो फक्त विचार करायला शिकत नाही.
त्यामूळे ज्यांना काही सुचले नाही त्यांनी काळजी करु नका. कारण तुमच्यासाठी माझ्याकडे काही कल्पना आहेत.
तूम्ही शाळा कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी असाल किंवा करियरच्या मार्गावर असाल एक लक्षात घ्या बऱ्याच वेळा आपण एखादं मोटिवेशनल पुस्तक वाचुन एकदमच मोठा बदल करायला जातो. जसे लगेच जिम जॉईन करणे, जराही आवड नसताना पुस्तक वाचायला घेणे, ध्यान धारणा करणे सोशल मिडिया म्हणजे व्हॉटसअप, फेसबुक इतर सर्व ऍप जोशात डिलिट करणे इत्यादी…
पण मग काय होते ? किती वेळ टिकतो हा बदल ? तुमच्या आजूबाजूचे मंडळी तुम्हाला आवाहन देतात, चिडवतात, तुमचा व्रत भंग करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ९५% लोक पहिल्या १५ दिवसातच केलेल संकल्प मोडतात. ह्यामुळे अर्थातच आत्मविश्वास वाढवण्याऐवजी त्याला सुरुंग लागतो आणि हळू हळू आपण बदल घडवण्याचा प्रयत्न सोडून देतो व ते टाळण्यासाठी विविध कारणे देतो. कोणी म्हणते मला आता सवय झाली आहे बदलणार नाही, तर कोणी म्हणते ह्या छोट्या छोट्या गोष्टी ने काय फरक पडणार आहे ? आणि कोणी परिस्थिती कुटुंबाला किंवा समाजाला कारणीभूत ठरवतात.
*”म्हणून बदल घडवू नका परिवर्तन घडवा. बदल हा तात्पुरता असतो आणि परिवर्तन कायमस्वरुपी असते.”*
थोडक्यात सांगायचे झाले तर फुलपाखरु होण्याची प्रक्रिया बघा, शेतकरी वर्षभर थोड्या थोड्या पण वेगवेगळ्या कृती करुन पिक पिकवण्यची कृती बघा, ऋतू बदलण्याची कृती बघा, फुलझाडांना फुले येण्याची प्रक्रिया बघा; तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक नैसर्गिक परिवर्तनाचा स्वतः चा एक वेग असतो.
भारतात चार महिने उन्हाळा, चार महिने पावसाळा आणि चार महिने हिवाळा असतो. पण जर काळजीपूर्वक लक्ष दिले तर लक्षात येइल प्रत्येक वेळेस नविन ऋतू येताना अनेक बारिक सारीक घटना घडत असतात आणि मग निसर्गातील प्रत्येकालाच परिवर्तन होतय याची कल्पना येऊ लागते तसेच सर्वजण ह्या परिवर्तनासाठी तयार होतात त्याचे स्वागत करतात.
उदाहरणच द्यायचं झालं तर बघा उन्हाळा संपू लागताच मान्सुनचे वारे वाहू लागतात मग आपल्याला अनेक दुकानांमध्ये छत्र्या, रेनकोट विकताना लोक पाहायला मिळतात. पावसाळा संपत येताना केलंडर मध्ये अनेक सण दिसू लागतात आणि आता दुकानांमध्ये स्वेटर, शॉल असे गरम कपडे आपल्याला पाहायला मिळतात.
निसर्गाचा हाच गुण आपण आत्मसात केला तर परिवर्तन ही प्रक्रिया सहज शिकता येईल. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही प्रक्रिया शिकण्यासाठी सर्वात पहिली कृती कोणती करावी. कदाचीत मी जे उदाहरण तूम्हाला देईन ते वाचून तूम्हाला नवल वाटेल हसू येईल तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या अशा कृतींनी खरच परिवर्तन घडेल का ??
तर मित्रानो उत्तर आहे … हो !! ते कसं हे अनुभवायचं असेल तर पुढिलपैकी कोणत्याही २ ते ५ गोष्टींवर विचार करा आणि लगेच कृती करा…
आजच आताच…!!
उदा.
१. स्वतः चे ( पुस्तकांचे / कपड्यांचे ) कपाट स्वच्छ व नीटनेटके लावा.
२. घराजवळ, शाळेजवळ, वसाहती जवळ एक झाड लावा, किंवा असलेल्या झाडांना पाणी द्या.
३. स्वतः च्या किंवा घरातील इतर सदस्यांच्या अंथरुणाच्या घड्या घाला.
४. बरेच दिवस बोलणे झाले नाही अशा एखाद्या जुन्या मित्राला पत्र लिहा किंवा फोन करा.
५. जिथे कुठे पाण्याचा अपव्यय होताना दिसत असेल तर ते वाचवण्यासाठी योग्य ती कृती करा.
६. स्वतः ची स्कूल कॉलेज किंवा ऑफिस ची बॅग स्वच्छ करा. त्यातील नको असलेले कागदाचे कपटे, बंद पडलेले पेन इतर न लागणाऱ्या वस्तू काढून टाका.
७. तुमच्या जुन्या शिक्षकांना जाऊन भेटा. त्यांची खुशाली विचारा, भेटणे शक्य नसल्यास फोन किंवा मेल द्वारे संपर्क करून त्यांचे आभार माना.
८. मनाला सुचेल त्या विषयावर भरभरून लिहा.
९. एखाद्या आदर्श कार्यक्रमाला जा.
१०. एखाद्या दिवशी तुमचं पॉकेट मनी आई वडील बहीण भाऊ यांच्यासाठी खर्च करा.
११. एखादे चित्र काढा. ( जमल्यास मित्र मैत्रिणींना भेट द्या )
१२. एखाद्या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमास भेट द्या. त्यात सहभागी व्हा.
१३. आई वडील कुटुंबातील इतर सदस्यांना थँक्यू म्हणा, पत्र स्वरूपात मेसेज स्वरूपात किंवा त्यांचे आवडीचे खाद्य पदार्थ तयार करून किंवा आणून द्या.
१४. एखाद्या मित्राला अभ्यासात मदत करा.
१५. तुमचे ध्येय असलेल्या करीयर संदर्भात माहिती गोळा करा.
१६. छान डोंगराळ ठिकाणी ट्रेकला जाऊन या.
१७. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण एखाद्या सकारात्मक ग्रुपला जाऊन भेटा किंवा त्याचे सदस्य व्हा.
१८. सहजच एखाद्या वृद्धाश्रमाला किंवा बालश्रमाला भेट द्या.
१९. एखाद्या अंध किंवा अपंग व्यक्तीला रस्ता ओलांडताना किंवा इतर लहान सहान गोष्टींसाठी मदत करा.
२०. शाळा कॉलेज किंवा तुमच्या संस्थेसाठी एखादा आकर्षक सूचना फलक किंवा त्यासारखी भेट द्या. इत्यादी.
मित्रांनो, झालात ना आश्चर्यचकित !! ह्या सर्व गोष्टी करून काय परिवर्तन होणार हाच विचार करत असाल ना ?? ” परिवर्तन ” होणार, नक्कीच होणार कारण ह्या गोष्टी करताना आणि त्या करून झाल्यावर तुम्हाला स्वतः मधील, समोरच्यामधील, समाजामधील भावनिक शारीरिक बदल अनुभवायचे आहेत आणि ह्या सर्व गोष्टी केल्यावर तुम्हाला स्वतः ला शाबासकी द्यायची आहे. स्वतः चे कौतुक करायचे आहे, कारण जो व्यक्ती स्वतः ला शाबासकी देत नाही त्याला फार कमी वेळा इतर लोक शाबासकी देतात.
आता शेवटचा भाग, तो म्हणजे आपण ठरविल्याप्रमाणे पुढचा एक महिनाभर आपण एका धड्याचा अभ्यास करायचा आहे. सोबतच प्रत्येक बदल अनुभवायचा आहे माझ्या गुरूंनी मला एक नियम सांगितला होता; तो असा की, ” जोपर्यंत आपण कोणाला उत्तर देण्यास जबाबदार होत नाही तोपर्यंत परिवर्तनाच्या वाटेवर सातत्य येत नाही.” म्हणूनच गेली आठ वर्ष मी माझ्या गुरूंना माझ्या दिनचर्येची माहिती देतो. विशेषकरून त्या गोष्टींची ज्यांमुळे माझ्यामध्ये परिवर्तन घडणार आहे.
त्यामुळे ह्या महिन्यात तुम्ही ज्या गोष्टी करण्याचे ठरवले आहे, ज्या गोष्टी तुम्ही आजपासून करणार आहात त्याबद्दल एका जबाबदार व्यक्तीला सांगा जो तुम्हाला शाबासकी देईल, मार्गदर्शन करेल अशी व्यक्ती जिचा तुम्ही आदर करता, मग ते तुमचे आई वडील, शिक्षक, काका, मामा कोणीही असू शकते. ही पायरी खूप महत्त्वाची आहे.
पुस्तकाच्या शेवटी मी माझा व्हॉटसअप नंबर आणि पोस्टल पत्ता दिला आहे. त्यामुळे तुम्ही मला संपर्क करू शकता. मी तर म्हणेन कराच, कारण तुम्हा सगळ्यांचे प्रश्न वेग वेगळे असतील त्यामुळे अर्थातच त्यांची उत्तरेही वेगळे असतील. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे पत्राद्वारे किंवा व्हॉटसअप द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवेन. मित्रांनो मी माझ्या आयुष्यासाठी काही सूत्रे ठरवली आहेत जी मला योग्य मार्गावर, प्रगतीपथावर ठेवतात. मी अनेक यशस्वी माणसांना हे करताना पाहिले आहे.
*”ACTION IS MATTER OF SUCCESS.”*
हे पुस्तक वाचताना; वाचताना म्हणण्यापेक्षा अनुभवताना तुम्हाला असे वाटणे साहजिकच आहे की ह्या सर्व गोष्टी ज्या मी करणार आहे त्या याआधी कोणी केल्या आहेत का ?? आणि केल्या असतील तर त्यांचा अनुभव काय आहे ? तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळावं म्हणून ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पाठानंतर ज्यांनी ह्या कृती केल्या आहेत. त्यांचे अनुभव व संपर्क दिला आहे. तुम्ही थेट त्या अनुभवी विद्यार्थ्यांकडून सुद्धा मदत घेऊ शकता.
पुढील पाठाचा अभ्यास सुरू करण्याआधी एक सुंदर वही / डायरी तयार करा. ह्या वहीत / डायरीत तयार होणार आहे तो नकाशा जो प्रत्येक यशस्वी माणसाकडे असतोच.
– श्री. अजय खोतु दरेकर